गूढ, रहस्य आणि भय यांची सरमिसळ असलेली एक कथा पुन्हा एकदा मराठी रुपेरी पडद्यावर उलगडण्याच्या तयारीत आहे. ‘जारण’ या चित्रपटाचा थरारक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो पाहून प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला आहे. विवाहितेच्या आयुष्यात अचानक घडणारे सावल्यांचे खेळ, वाड्याच्या भिंतींमध्ये दडलेला काळोख आणि तिच्या भूतकाळाशी असलेलं नातं — हे सगळं काही प्रेक्षकांना एका वेगळ्याच भयभीत प्रवासात घेऊन जातं. राधा नावाची विवाहित स्त्री एका जुन्या वाड्यात पाऊल ठेवते आणि तिच्या आयुष्यात अशा काही अनाकलनीय घटना घडायला सुरुवात होते की, त्या वास्तव आहेत की भ्रम, हेच कळेनासं होतं. तिचे डोळे भांबावलेले, तिच्या चेहऱ्यावरचे अस्वस्थ भाव, आणि तिच्याभोवती निर्माण होणारी एक अदृश्य भीती — हे सगळं ट्रेलरमध्ये इतकं प्रभावीपणे सादर करण्यात आलं आहे की, क्षणभर प्रेक्षक त्यात हरवून जातो. विशेषत: अनिता दाते यांचा मंत्रोच्चार करत केलेला आविष्कार, त्यांचे चेहऱ्यावरचे भाव आणि पार्श्वसंगीताची मंत्रमुग्ध साथ — हे भयावहतेला एक नवे परिमाण देतात..

एकीकडे स्त्रीच्या मानसिक संघर्षाचं भावनिक चित्रण, तर दुसरीकडे काळ्या जादूच्या अंधश्रद्धांनी व्यापलेली वाड्याची भिंत — या दोहोंच्या नाट्यपूर्ण संघर्षातून उभं राहिलेलं ‘जारण’चं विश्व अतिशय अस्वस्थ करणाऱ्या पद्धतीने मांडण्यात आलं आहे. ‘जारण’मध्ये केवळ काळ्या जादूचा उल्लेख नाही, तर त्यामागे दडलेली स्त्रीची वेदना, लहानपणीच्या एका रहस्यमय घटनेचा तिच्या सध्याच्या आयुष्यावर होणारा परिणाम आणि त्या वाड्याशी तिचा असलेला गूढ संबंध यांचीही झलक या ट्रेलरमध्ये दिसून येते. राधाच्या मनात दडलेले भय तिच्या आठवणींमधून पुन्हा पुन्हा जागं होतंय की, ती कोणाच्या जारणाचा शिकार झाली आहे — याचं उत्तर चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे.
या ट्रेलरच्या लाँचप्रसंगी निर्माण झालेला भयावह माहोल अनुभवणंही तितकंच अविस्मरणीय असल्याचं उपस्थित सांगतात. बॉलिवूडमधील प्रतिष्ठित दिग्दर्शक अनिल शर्मा, विकास बहल आणि राज मेहता यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची झळाळी वाढली. विशेष म्हणजे ‘भूलभुलैया २’, ‘वेलकम’, ‘रेडी’ यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अनिस बाझमी यांनी ‘जारण’च्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत प्रदर्शक म्हणून प्रवेश केला आहे, हेही या चित्रपटाचं विशेष.
हृषीकेश गुप्ते यांच्या लेखन आणि दिग्दर्शनात तयार झालेला हा चित्रपट ५ जून २०२५ रोजी प्रदर्शित होतो आहे. अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या सशक्त भूमिकांमधून या भयकथेचं चित्रण असणार आहे, तर किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे यांसारखे मातब्बर कलाकारही आपल्या अभिनयाने कथेला भक्कम साथ देताना दिसतील. ‘जारण’ केवळ एक भयपट नसून, अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या समाजाचं आणि एका विवाहित स्त्रीच्या अस्तित्वासाठी चाललेल्या मानसिक लढ्याचं प्रतिनिधित्व करणारी कहाणी ठरणार आहे.
प्रस्तुतकर्ता अनिस बाझमी म्हणतात, ‘’ या चित्रपटाशी मी जोडलो गेलो, हे मी माझे भाग्य समजतो. अमृता सुभाषला मी आधीपासूनच ओळखतो. अतिशय हुशार अभिनेत्री आहे आणि तिच्यामुळेच मी या चित्रपटाचा भाग झालो, असे म्हटले तरी चालेल. जेव्हा मी हा चित्रपट बघितला. मी सुन्न झालो. अंगावर अक्षरशः काटा आला. कथा, दिग्दर्शन, अभिनय अप्रतिम. मराठीत पदार्पण करण्यासाठी यापेक्षा दुसरा कोणता चित्रपट असूच शकत नाही. कलाकारांनी आपल्या अभिनयाने या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. भाषा जरी मराठी असली तरी हा पॅन इंडिया चित्रपट आहे.‘’
दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते म्हणतात, “ ‘जारण’ हा मानवी भावनांची आणि अंधश्रद्धेच्या परिणामांची खोल उकल करणारा चित्रपट आहे. ट्रेलरमध्ये जरी काही दृश्य गूढ आणि धक्कादायक वाटत असली, तरी या सगळ्याच्या पाठीमागे एक खोल भावनिक गुंतागुंत आहे. अनिता दाते आणि अमृता सुभाष यांचा जबरदस्त अभिनय प्रेक्षकांच्या मनात खोलवर घर करेल. हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ठरेल याची मला खात्री आहे.”
निर्माते अमोल भगत म्हणतात, “ या चित्रपटातून अंधश्रद्धा आणि मानसिकतेतून होणाऱ्या छळाचे वास्तव दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. टीझरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला, आता ट्रेलर ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी अपेक्षा आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने आपली कामगिरी चोख बजावली असल्याने चित्रपट उत्तम बनला आहे. हा थरारपट प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल.”